Baalgram

बाबासाहेब देशमुख : एक दीपस्तंभ

बाबासाहेब देशमुख : एक दीपस्तंभ

बालग्राम म्हणजे SOS Childrens Village. या प्रकल्पाला देशात सुरुवात झाली ती १९७० नंतर. हरमन मायनर या ध्येयवेड्या माणसानं या संस्थेचं काम दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये सुरू केलं. युरोपमध्ये अनेक देशांची वाताहत झालेली होती. पुरुष; विशेषतः तरुण, युद्धात मोठ्या प्रमाणात मारले गेले होते. ही परिस्थिती युरोपमधील अनेक देशांत होती.

अनाथ, विधवा, वयस्कर महिलांचा चरितार्थ कसा चालणार ही व्यथा होती. तीच गोष्ट अनाथांची, बालकांची; अर्थात् मोठ्या घटकांची होती. मायनर यांनी एक उपाय शोधला. त्यातून या प्रकल्पाचा जन्म झाला. एका अनाथ स्त्रीनं सात-आठ मुलांचं संगोपन कसं करावं… तिला घराचं आणि या सर्वांचं संगोपन सर्वार्थानं करण्यासाठी पुरेसा आर्थिक पुरवठा व मार्गदर्शन करायचं… त्यामुळे स्त्रीला घर आणि सुरक्षितता मिळते; तर मुलांना माता, आधार, संस्कार मिळतात.

बाबासाहेब देशमुख यांचं भव्य व्यक्तिमत्त्व, अतिशय मृदू भाषा, धिप्पाड देह, राहणीतील अगदी साधेपणा, कामाची तळमळ यांतून मी त्यांच्याकडे ओढला गेलो. का कोण जाणे, मला त्यांच्यात माझ्या वडिलांचा भास होत असे. त्यामुळे आमची घसट तर वाढलीच; परंतु ते पुण्यात आले की घरी जेवायला येणं हे नियमित व्हायला लागलं.

त्यांच्या ट्रस्टला मी कधीच मोकळ्या हातानं जाऊ दिलं नाही. अगदी आजतागायत. बाबासाहेब २००४ मध्ये वारले; परंतु त्यांच्या कुटुंबीयांशी ऋणानुबंध कायमचे जोडले गेले आहेत. आमच्या संबंधांत जिव्हाळा आणि निःस्वार्थ प्रेम होतं. समाजासाठी देण्याच्या त्यांच्या योगदानाचं मनापासून कौतुक तर होतंच; त्याचबरोबर एक आदराची भावनाही होती.

बाबासाहेब हे महाराष्ट्र-तेलंगण यांच्या सीमेवरील सगरोळी (जिल्हा : नांदेड) इथले. हैदराबाद इथं शिक्षण पूर्ण करून ते गावी परत आले ती आपली मोठी शेती करण्यासाठी. सुशिक्षित व मृदू स्वभाव, मदत करण्याची वृत्ती यांमुळे गावकऱ्यांनी त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड केली.

शिक्षणाबद्दल त्यांना कळकळ होतीच. त्यामुळे चौथी पास झाल्यावर आपल्या मुलीला त्यांनी पुण्यात महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या ‘स्त्री शिक्षण संस्थे’त दाखल केलं. मराठवाड्यात शिक्षणाची फारशी सोय तेव्हा नव्हतीच. त्यानिमित्तानं त्यांची महर्षी कर्वे यांच्याशी भेट झाली. हा त्यांच्या जीवनातील एक मोठं वळण घेणारा भाग ठरला.

कर्वे यांच्या भेटीनंतर बाबासाहेबांनी ‘संस्कृती-संवर्धन मंडळा’ची स्थापना केली. यात प्रामुख्यानं मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य होतं. त्या काळात मराठवाड्यात हा विचारही बहुतांश समाजाच्या डोक्यात नव्हता. यानिमित्तानं बाबासाहेबांनी उत्तम शिक्षक शोधून त्यांना सगरोळीला आणण्याच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिलं. शिक्षक उत्तम असतील तर चांगले विद्यार्थी घडतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.

आजही आपण आपल्या शिक्षकांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो ते यामुळेच. मराठवाड्यातील पराकोटीचं अज्ञान आणि त्यामुळे असलेलं दारिद्र्य ही वस्तुस्थिती होती. भाऊराव पाटील यांच्या ‘रयत शिक्षण संस्थे’ प्रमाणे बाबासाहेबांनी गरीब, मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शाळेबरोबरच वसतिगृहेही उभी केली. याच प्रयत्नात आर्थिक ताण कमी करण्यासाठी त्यांनी स्वतःची १५० एकर जमीन संस्थेला दान केली! या तळमळीतून अनेक विद्यार्थी, मुलं, मुली ‘संस्कृती-संवर्धन मंडळा’च्या शाळेत येऊ लागली.

एक शैक्षणिक चळवळ उभी राहिली. तिचं अनुकरण मराठवाड्यात साहजिकच सुरू झालं. बाबासाहेबांच्या तळमळीचं, त्यागाचं, प्रामाणिकपणाचं ते फळ होतं. या सुमारास बाबासाहेबांचा ‘बालग्राम’ चळवळीशी संपर्क झाला आणि ते त्यातील एक भाग म्हणून समरस झाले. इतके की, ते ध्यानातही येऊ नये. त्यांनी सगरोळी इथं ‘बालग्राम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि अमलातही आणला. सगरोळीला एकदा पुरामुळे मोठी हानी झाली. ‘सकाळ रिलिफ फंडा’तून शक्य ती मदत करण्यात आली. त्याचं ऋण ते कधीच विसरले नाहीत.

बाबासाहेब आमच्यातील प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध ठेवत. कुणी नवीन काय केलं याविषयी चर्चा करत. ‘विद्यार्थी समिती’चं काम कसं चालतं यासाठी अच्युतराव आपटे, महिलांसाठी काम करणाऱ्या शोभनाताई रानडे, निर्मलाताई पुरंदरे यांच्याशी ते चर्चा करत.

डॉ. दादा गुजर यांच्या हॉस्पिटलला भेट देणं, अगदी माझे वडीलबंधू पद्मश्री अप्पासाहेब पवार यांना बारामतीत भेटणं, त्यांच्याकडून शिकणं, त्यांना सगरोळीला मार्गदर्शनासाठी बोलावणं हे बाबासाहेबांच्या स्वभावात होतं. ध्येयवादी तळमळीच्या प्रेरणेतून स्वतःची दीडशे एकर जमीन देऊन आदर्श घालून देणाऱ्या या बाबासाहेबांबद्दल कुणालाही प्रेम, जिव्हाळा वाटल्यास आश्‍चर्य वाटण्याचं कारण नाही.

बाबासाहेबांचे चिरंजीव प्रमोद देशमुख आता त्यांची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. ॲग्रिकल्चरल कॉलेज, कृषी विज्ञानकेंद्र, मुलींची सैनिकी शाळा असे अनेक नवीन प्रकल्प त्यांनी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून सुरू केले. बाबासाहेबांनी मला अनेकदा सगरोळीला येण्याचा आग्रह केला; परंतु ते मला जमलं नाही. बाबासाहेबांचं सन २००४ मध्ये निधन झालं. त्यांच्या हयातीत सगरोळीला न गेल्याची चुटपुट माझ्या मनाला कायम लागून राहिली आहे.

बाबासाहेबांच्या परंपरेनं आता छान बाळसं धरलं आहे. ‘अफार्म’सारख्या अनेक संस्थांशी संबंध जोडून सतत सुधारणा, वाढ सुरू आहे. दरम्यान, सन २०१२ मध्ये बालग्राम संस्थेचे संस्थापक जाधवसाहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ. जाधव आणि शोभनाताई रानडे यांना माझ्यासोबत घेऊन मी विमानानं नांदेडला गेलो. तिथं दोन दिवस घालवले.

शेकडो माजी विद्यार्थी बाबासाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिथं आलेले होते. ‘एकता’ मासिकानं काढलेल्या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आम्हीही याच कारणामुळे तिकडे गेलो होतो. सायन्स पार्क, कृषी विज्ञान केंद्र, उत्कर्ष कौशल्य विकास केंद्र आणि औद्योगिक क्षेत्राच्या गरजेवर सुरू केलेले अनेक अभ्यासक्रम वगैरे गोष्टी प्रत्यक्ष पाहता आल्या. कार्यकर्त्यांशी चर्चा करता आली. काही नवीन गोष्टी पाहता आल्या.

लेखात उल्लेखिलेल्या सर्व व्यक्ती म्हणजे समाजहितासाठी आयुष्य वेचलेली फुलं असून बाबासाहेब हेही याच माळेतील एक सुगंधी फूल आहेत. बाबासाहेबांनी जन्माला घातलेल्या ‘संस्कृती-संवर्धन मंडळा’चं वटवृक्षात रूपांतर झाल्याचं ‘याचि देही, याचि डोळा’ आम्हाला पाहता आलं. मन भरून आलं.

बाबासाहेबांच्या भारावलेल्या आठवणींसह (पाणावलेल्या डोळ्यांनी) आम्ही तिघांनी सगरोळीचा निरोप घेतला. बाबासाहेबांची आठवण माझ्या हृदयात चिरंतन राहील. आणि, आता कदाचित तुमच्याही…